बुलडाणा : गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाच्या नुकसानभरपाईपोटी मदत म्हणून देण्यात आलेल्या निधीचा तिसरा हप्ता अद्यापही जिल्ह्याला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश्य स्थितीत शेतकरी त्रस्त झाला असून या निधीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालेली आहे. त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा, अशी ओरड होत आहे. या निधीच्या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात कापसाची बोंडेही फेकली होती. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता सध्या वाढत आहे. तिसर्या टप्प्यात जिल्ह्याला ४४ कोटी ७८ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान या नुकसान भरपाईपोटी मिळणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी केंद्राच्या पथकाने जिल्ह्यात येऊन पाहणीही केली होती. त्यानंतर तसा अहवालही पाठविला होता. त्या आधारावर जिल्ह्याला १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळणार होती. आतापर्यंत दोन टप्प्यात ८९ कोटी ५६ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून एक लाख ३६ हजार ८६५ शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र उर्वरित शेतकर्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. तिसर्या टप्प्यात हा निधी उपलब्ध होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे हा निधी त्वरेने मिळावा, अशी ओरड शेतकर्यांमधून होत आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता शेतकर्यांना राहलेली ही नुकसान भरपाईची रक्कम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या दृष्टीने जिल्हास्तरावरून हा निधी मिळण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे आहे.