गजानन तिडके
देऊळगाव राजा : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्केच पाऊस झाला असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे़ काही भागात पावसाअभावी पेरण्या खाेळंबल्या आहेत़ यावर्षी शेतकऱ्यांचा कल साेयाबीन पिकाकडे असल्याचे चित्र आहे़
देऊळगाव राजा तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४७ हजार ६७५ हेक्टर एवढे असून पेरणीयोग्य क्षेत्र ३५ हजार ९४१ हेक्टर आहे़ याच क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली हाेती़ तसेच रब्बीची पेरणी १२ हजार ३९० हेक्टरवर करण्यात आली होती़ यामध्ये कडधान्य पिकामध्ये उडीद,मूग,तूर, एकूण पाच हजार ४७ हेक्टर होते़ तृणधान्यामध्ये बाजरी, मका ,ज्वारी याचे क्षेत्रफळ ६०३ हेक्टर होते़ तालुक्यामध्ये सर्वात जास्त कापूस १८ हजार २२८ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती़ गळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन १२ हजार ५६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती़ विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगावराजा तालुक्याला कापसाची पंढरी म्हणून समजली जाते़ त्यामुळे येथे १० ते १२ जिनिंग फॅक्टरी आहेत़ परंतु मागील वर्षी हाती आलेल्या कापूस पिकावर बोंड अळी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे उत्पादन घटले़ औषध फवारणी आणि खत तसेच इतर खर्चही निघाला नाही़ तसेच मूग आणि इतर पिकांचे काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ गतवर्षीचा अनुभव पाहता कपाशीच्या पेऱ्यात घट हाेण्याची शक्यता आहे़
४७ मिमी पावसाची नाेंद
रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने उघड दिल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मागील वर्षी या महिन्यात आजच्या तारखेपर्यंत ८१ .४० मि. मी. पाऊस झाला होता़ परंतु यावर्षी आजपर्यंत ४७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे़ पावसाचे प्रमाण पाहता काही भागात शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केली आहे़
मार्गदर्शनाचा अभाव
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बाजारात येणाऱ्या नवनवीन बियाणे तसेच खत यांच्या प्रमाणासंदर्भात तसेच बियाणे लागवडीसंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे़ प्रत्येक गावाला कृषी सहायक, कृषीसेवक यांची तालुका कृषी कार्यालयाकडून नेमणूक केलेली असते़ परंतु बहुतांश गावामध्ये फिरकत सुद्धा नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पिकांची लागवड तसेच पेरणी केली जाते आणि यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते़
काेट
जमिनीमध्ये पाच ते सहा इंच ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पीक पेरणीला तसेच लागवडीला सुरुवात करू नये़ शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना दुकानदाराकडून सीलबंद पाकिटासह पक्के बिल घ्यावे़ तसेच कृषी विभागाच्या शिफारशीप्रमाणे खताचा वापर करावा़ फवारणी संदर्भात कृषी विभागाचा सल्ला घ्यावा़
कृणाल चिंचोले, कृषी अधिकारी,पंचायत समिती देऊळगाव राजा