माेताळा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली़ मात्र, गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. आधीच कोरोनाने बेहाल झाल्यानंतर या नव्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात ५९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रफळ हे पेरणीस योग्य आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होत असून यंदा समाधानकारक तसेच पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतली. वेळेवर पाऊस येणार या आशेने पेरणी करून घेतली; परंतु नेहमीप्रमाणे यंदाही मान्सूनने शेतकऱ्यांना दगा दिला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी ५९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रफळापैकी जवळपास अंदाजे ८२ टक्के क्षेत्रफळावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करून घेतली; परंतु ही पेरणी होत नाही तोच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जून महिन्यात ८४ मिमी पाऊस
जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस त्याच्या सरासरीपेक्षा ८४ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामध्ये मोताळा महसूल मंडळात तालुक्यातून सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. तरीही पीक परिस्थिती मात्र तालुक्यातील इतर महसूल मंडळांसारखीच आहे.
पिंप्री गवळी महसुलात सर्वाधिक पाऊस
तालुक्यातील सात महसूल मंडळांत मोताळा महसूल मंडळात जून महिन्याच्या सरासरीच्या ९१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर बोराखेडी महसूल मंडळात ५९ मि.मी., धामणगाव महसूल मंडळात ३० मि.मी., पिंप्री गवळी महसूल मंडळात ६६ मि.मी., रोहिनखेड महसूल मंडळात ३९ मि.मी. आणि पिंपळगाव देवी महसूल मंडळात ५३ मि.मी. तर शेलापूर महसूल मंडळात ४६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.