बुलडाणा : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका वृद्ध निराधाला एकाने आश्रय दिला, तर दुसऱ्याने दृष्टी देऊन सामाजिक दातृत्व जपल्याचे उत्तम उदाहरण दिसून आले. निराधाराच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची वाट दाखविणारे माणुसकीचे दर्शन बुलडाण्यात पाहावयास मिळाले.
कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक संस्था समाजकार्यासाठी पुढे आल्या होत्या. परंतु काही संस्था, व्यक्ती असेही आहेत, जे सदैव निराधारांच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्याचा प्रत्यय बुलडाण्यात वारंवार येतो. बुलडाण्यातील दिव्या सेवा प्रकल्पाने निराधारांना मायेचे छत निर्माण केले आहे. दिव्या सेवा प्रकल्पामध्ये राजेंद्र बाळाजी बकाल या निराधार व दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीला मंगरूळ नवघरे येथील काही नागरिकांनी अडीच महिन्यांपूर्वी आणले होते. राजेंद्र हे पूर्वी गावात भीक्षा मागून आपले पोट भरत होते. परंतु आता त्यांची प्रकृती चांगली राहात नसल्याने त्यांना दिव्या सेवा प्रकल्पाने आश्रय दिला. प्रकल्पाचे अशोक काकडे यांनी राजेंद्रच्या अंधत्वाचा प्रश्न येथील नेत्रतज्ज्ञ डाॅ. शोन चिंचोले यांच्यासमोर ठेवताच डाॅ. चिंचोले यांनी त्या रुग्णाची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून सेवावृत्तीचे दर्शन घडवून दिले. सोबतच मिलिंद मोरे यांनीही त्या निराधार व्यक्तीच्या विविध तपासण्या मोफत केल्या.
सेवेत आनंद...
अंध परंतु निराधार असलेल्यांना मोफत दृष्टी देण्याचे काम नसून ती एक सेवा आहे. या सेवेतच मोठा आनंद मिळतो. प्रत्येक डाॅक्टराने आपल्यातील सेवावृत्ती जपली पाहिजे.
- शोन चिंचोले, नेत्रतज्ज्ञ
दिव्या सेवाचे मोठे यश
एका निराधार अंध व्यक्तीला केवळ आधारच नाही, तर दृष्टी देऊ शकलो, हे दिव्या सेवा प्रकल्पाचे मोठे यश असून, यामुळे सदस्यांना काम करण्याची एक ऊर्जा मिळाल्याचे मत अशोक काकडे यांनी व्यक्त केले. अशीच मदत प्रत्येकाने करून माणुसकीचे दर्शन घडत राहो, असा निर्धार सदस्यांनी केला आहे.