कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद करण्यात आली होती. त्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
जिल्ह्यात काही बस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील लोणार ते किनगाव जट्टू बसफेरी अजून सुरू झाली नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील दहा ते बारा खेडेगावातील नागरिकांचा लोणार येथे नेहमी संपर्क असतो. लोणार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील, पंचायत समिती व तालुक्याची इतर शासकीय कार्यालये असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वारंवार कामानिमित्त लोणार येथे जावे लागते. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले असल्याने बी बियाणे, रासायनिक खत लोणार येथून शेतकऱ्यांना आणावे लागते. लोणार येथे जाण्याकरिता दुसरा मार्ग बीबीवरून असून त्याचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेळ व पैसा वाया जातो. खासगी वाहन केल्यास दामदुप्पट रक्कम द्यावी लागत असल्याने हा प्रवास परवडत नाही. त्यामुळे मेहकर आगारातून सुटणारी लोणार ते किनगाव जट्टू बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.