देऊळगाव मही : शासनाच्या विविध योजना निराधारांसाठी असल्या तरी सध्या कोरोनाच्या काळात अधीच हाल झालेल्या निराधार व्यक्तींना गेल्या दोन महिन्यापासून या विशेष योजनांचे पैसेच अद्याप न मिळाल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाकडून अजूनही पेन्शन न आल्याने या निराधारांना पोस्ट कार्यालय आणि बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
ग्रामीण भागातील निराधार लाभार्थी पोस्टमनची दरदिवशी आतूरतेने वाट पाहत आहेत.
विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभांच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना दोन राज्य सरकारच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना सरकार तर्फे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थ्यांला दरमहा एक हजार रुपये अनुदान देण्यात येते. कोरोना काळात शासनाच्या विविध योजनांचे पैसे रखडले आहेत. त्याचा फटका निराधार लोकांसाठी असलेल्या या विशेष योजनांच्या लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शासनाकडून ही पेन्शन प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळत नसल्याने या लोकांचे हाल होत आहेत. यापैकी बहुतेक निराधार व्यक्ती ७० ते ८० वर्षांचे असल्याने काही वृद्ध महिलांना भीक मागून गुजराण करण्याची वेळ आली आहे. खेडोपाडी पोस्टाच्या शाखा असल्याने या लभर्थ्यांना थेट खात्यावर पैसे जमा होतात. ज्यांना पोस्टात जाऊन पैसे काढणे शक्य होत नाही. अशांना पोस्टाच्या विशेष सुविधामुळे पोस्टमन त्या गावात लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलद्वारे त्यांना पैसे काढून देतात. मात्र सध्या या निराधारांची जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची पेन्शन अजूनही ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेली नाही. सध्या होळी सण जवळ आलेला आहे. त्यामुळे ही पेन्शन या उत्सवापूर्वी शासन देईल, अशी आशा त्यांना वाटत आहे. त्यामुळे पोस्टातून पैसे आणणाऱ्या पोस्टमनची दरदिवशी वाट वघत आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहेत. ही पेन्शन कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रशासन दुर्लक्षामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. कोरोनाच्या काळात मेटाकुटीला आलेल्यांना आता पेन्शन धारकांना पेन्शनसाठी झगडावे लागत आहेत.