पीक विमा योजनेकिरता खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व मका पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे. सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण देय राहणार आहे. टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पीककापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नपेक्षा कमी आले, तर नुकसान भरपाई देय असणार आहे.
पीकविमा भरण्याला सुरुवात
पीकविमा भरण्याला सुरुवात झाली आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगरकर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. या योजनेसाठी जिल्ह्याकरिता रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षित रक्कम
खरीप ज्वारी : विमा संरक्षित रक्कम २५ हजार,
हप्ता ५०० रुपये (प्रतिहेक्टर),
मका : विमा संरक्षित रक्कम ३० हजार,
हप्ता : ६०० रुपये,
तूर : विमा संरक्षित रक्कम ३५ हजार,
हप्ता : ७०० रुपये,
मूग : विमा संरक्षित रक्कम २० हजार,
हप्ता : ४०० रुपये,
उडीद : विमा संरक्षित रक्कम २० हजार,
हप्ता : ४०० रुपये,
सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम ४५ हजार,
हप्ता : ९०० रूपये
कापूस : विमा संरक्षित रक्कम ४५ हजार,
हप्ता : २२५० रुपये