चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या अवकाळी पावसाने अधिक भर घातली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. मदतीसाठी १ लाख ९५ हजार रुपयांची आवश्यकता आहे.
तालुक्यात मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पाऊस व वादळाने अनेक पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये वीज कोसळून व एका प्रकरणात गोठ्यास आग लागल्याने सात जणावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. मात्र, पात्र आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. कधी दुष्काळाची दहशत, कधी अतिपावसाची नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन या नैसर्गिक आपत्तीत हिरावले असून, यापोटी आवश्यक केवळ २ लाखांच्या आसपासचा निधी अद्याप स्थानिक प्रशासनास प्राप्त न झाल्याने आपत्तीग्रस्तांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या आपत्तीग्रस्तांबाबत स्थानिक महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र आपत्तीग्रस्त!
तालुक्यातील भोरसा येथे १६ एप्रिल रोजी कृष्णा मुरकुटे यांचा एक बैल, १९ मार्चला खंडाळा मं. येथील पांडुरंग ठेंग यांची गाय, २९ मे ला बोरगाव वसू येथील बिदेसिंग सुरडकर यांची गाय, ३० मे रोजी दिवठाणा येथील भगवान मोरे यांची म्हैस व २९ मे एप्रिलला अंत्री कोळी येथील नंदकिशोर वाघ यांच्या मालकीची वासरे अशी सहा जनावरे वीज कोसळून मृत झाले. धोत्रा भनगोजी येथील दगडू अक्कर यांच्या गोठ्यात २९ एप्रिलला आग लागून गाय व दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला.
केवळ पशुधानाची सात प्रकरणे पात्र!
यातील केवळ ७ प्रकरणे मदतीस पात्र ठरले. त्यामध्ये ३ बैलांसाठी ७५ हजार, तर ३ गायी व एक म्हशीसाठी १ लाख २० हजार असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.
शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर आपत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. तथापि, बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात बैलांची उणीव जाणवणार आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे असले तरी ते सध्याच्या घडीला मिळणे गरजेचे आहे.
विनायक सरनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.