- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दीड वर्षापूर्वी ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेल्या ‘टी१सी१’ वाघ अर्थात ‘वॉकर’ सध्या अभयारण्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रसंगी तो अंबाबरवा किंवा अजिंठा पर्वत रांगांमध्ये गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे.मेळघाटातून बोरीवलीतील अभयारण्यात गेलेल्या एका बिबट्याच्या नंतर सर्वाधिक भटकंती केलेला वाघ म्हणून ‘टी१सी१’कडे पाहिले जात होते. लॉग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगरर्स उपक्रमांतर्गत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र वन विभागाच्या अर्थसाहाय्यातून वाघांचा करण्यात येणाऱ्या अभ्यासांतर्गत ‘वॉकर’वर नजर ठेवल्या जात होती. ज्ञानगंगा अभयारण्यात तो बराच काळ स्थिरावला होता. त्याच्या वास्तव्यामुळे ‘ज्ञानगंगा’चे भाग्यही उजळले होते.मात्र जवळपास गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये या वाघाचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे अभयारण्य सोडून हा ‘वॉकर’ अन्यत्र तर गेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाही म्हणायला या वॉकरच्या गळ्यात रेडिओ कॉलर आयडीही लावलेली होती. त्याची बॅटरी डाऊन झाल्याने नंतर ती काढून घेण्यात आली होती. त्यामुळे त्याचे निश्चित ठिकाण वनविभागालाही शोधणे कठीण झाले आहे. याबाबत वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रसंगी ‘वॉकर’ अंबाबरवा अभयारण्य किंवा जळगाव खान्देशमधील भवानी अभयारण्य किंवा अजिंठा पर्वत रागांमध्ये गेला असल्याचा कयास नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त करण्यात आला.
वाघाच्या मेटिंगसाठीही प्रयत्नअगदी खासदार प्रतापराव जाधव यांनी वयात आलेल्या या वाघाला मेटिंगसाठी ज्ञानगंगात वाघीण सोडण्याचीही मागणी केली होती. पत्रव्यवहाराचा सोपस्कारही पार पडला होता. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटनेही त्यास सहमती दर्शवली होती. त्यासाठीची बैठक कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलावी लागली होती. आता तर वॉकरचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यातच वर्षातून दोनदा होणाऱ्या व्याघ्र संवर्धनाच्या बैठकांचेही काय झाले, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. साधारणत: सहा महिन्यातून किमान एक बैठक होणे अपेक्षित असते.