धामणगाव बढे : कोरोनाचे संकट सध्या गडद होत आहे. अशातच मोताळा तालुक्यातील जयपूर येथील एका वृद्धाचा बुलडाणा येथे गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित असल्यामुळे जयपूर येथे मृत व्यक्तीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. मात्र, त्यावर अंत्यसंस्कार कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी गावातील इरफान पठाण आणि शाहरूख खान यांनी मोठ्या हिंमतीने पुढे होत कोरोनाबाधित मृतकावर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली.
मृतकाची पत्नी व मुलगाही कोरोनाबाधित असल्याने येथे समस्या निर्माण झाली होती. ६० वर्षीय मृतकाचे पार्थिव बुलडाण्यातील रुग्णालयातून थेट जयपूर येथील स्मशानभूमीत आणण्यात आले होते. मात्र, कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जयपूर गावात कोरोनाबाधिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत होता. त्यावेळी इरफान पठाण व शाहरूख खान यांनी संबंधितांशी बोलून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि कोरोनाच्या संकट काळात धर्माच्या भिंती गळू पडल्या. ५ एप्रिलची ही घटना १४ एप्रिलला प्रत्यक्षात माहिती घेतली असता समोर आली.
कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार कुठल्या स्मशानभूमीत करायचे या कारणावरून यापूर्वी बुलडाण्यात राजकारण झाले होते. अगदी पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यावर्षी विषय गेला होता. त्यानंतर कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारास विरोध केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिला होता. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूर येथे दोन मुस्लिम व्यक्तींनी हिंदू मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा एक सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणावा लागले.
मोताळा तालुक्यातील जयपूर गाव सद्या कोरोनाचे हॉटस्पाट बनले आहे. मोताळा तहसीलदारांसह आरोग्य प्रशासन तालुक्यातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातच ही घटना घडल्यामुळे जयपूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यस्काराच्या प्रतीक्षेत पार्थिव बराच काळ होते. त्यावेळी इरफाण पठाण आणि अैाषध विक्रेता यांनी स्वत: हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सरण रचून कोरोनाबाधित मृतकाच्या मुलाच्या हस्ते पार्थिवास अग्नी देत हा अंत्यसंस्कार केला.
बुलडाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याचा पालिकेचा उपक्रम, देऊळगाव राजा येथे महिला अधिकाऱ्यांनी कोरोना बाधितावर केलेल्या अंत्यंस्काराच्या घटनेनंतर जयपूर येथेही अशाच पद्धतीने माणुसकीचे दर्शन घडले आहे. त्यामुळे समाजामध्येही एक सकारात्मक दृष्टिकोन व प्रसंगानुरूप मदतीसाठी धाव घेण्याची प्रवृत्ती अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट होत आहे.