लोकमत न्यूज नेटवर्कधाड : येथून साधारण १० कि.मी. अंतरावर असलेल्या दुधा या गावात गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून सार्वजनिक नळयोजना बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्याचे तीव्र टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. गावात एक कोटी रुपये खर्चून जलस्वराज्यची योजना सुरू करण्यात आली असली, तरी गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात दुधा येथील महिलांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेची नळ योजना पूर्ववत सुरू करून चौकशीची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की साधारण दोन वर्षांपूर्वी दुधा गावाकरिता जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. यामध्ये ढालसावंगी तलावातून गावासाठी पाणी आणल्या गेले. साधारण वर्षभर या योजनेचे पाणी दुधा ग्रामस्थांना मिळत होते. मात्र, मध्येच ही नळयोजना बंद पडल्याने महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रा.पं.ला विचारणा केली; परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या योजनेचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ही योजना ग्रा.पं.ने हस्तांतरित करून घेतली नाही. परिणामी ती बंद पडली. या संदर्भात प्रकल्पच्यावतीने राजगुरू यांनी माहिती दिली, की सदर प्रकल्प योजनेचे काम हे प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र दोन वर्षे झाली ग्रा.पं. प्रशासनाने ही योजना हस्तांतरित करून घेतली नाही. त्यामुळे शासनाच्यावतीने जास्त वेळ ही योजना सुरू राहू शकत नाही. ग्रा.पं. प्रशासनाने ही योजना हस्तांतरित करणे गरजेचे आहे.जलस्वराज्य योजनेत नागरिकांना कंत्राटदार आणि ग्रा.पं. प्रशासन यांचे अडेल धोरणामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी २२ मे पर्यंत पाणीपुरवठा नळयोजना पूर्ववत सुरू न झाल्यास महिलांच्यावतीने पाण्याचे टाकीवर बसून उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अनसूया वाघमारे, लीला शेलार, सरला सोनुने, शोभा सुरडकर, छाया कुसळकर, संगीता कुसळकर, अलका सोनुने, संगीता सोनुने यांच्यासह ५० महिलांच्या सह्या आहेत. जलस्वराज्य प्रकल्पांचे काम हे निकषानुसार झाले असून, कुठलीच त्रुटी नाही. ग्रा.पं. प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून ही योजना हस्तांतरित करून घेतली नाही. - शेखर मराठे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जलस्वराज्य प्रकल्पातील नळयोजनेची पाइपलाइन ३५ ते ४० ठिकाणी फुटलेली असून, विस्तारित भागात जलवाहिन्या टाकल्या गेल्या नाही. यात त्रुटी असल्याने हस्तांतरित केल्या गेली नाही.- कावेराबाई सोनुने, सरपंच, दुधा
एक कोटीची नळयोजना असूनही पाण्यासाठी भटकंती!
By admin | Published: May 22, 2017 12:39 AM