लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांचे सहकारातील तर माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे सिंचन क्षेत्रातील योगदान प्रचंड मोठे आहे. त्यांच्या इतके काम आपण करू की नाही, हे सांगणे अवघड असले तरी भारतभाऊंच्या काळात चालना मिळालेली आणि गोसीखूर्द प्रकल्पातील अतिरिक्त पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली.ते सोमवारी चिखली येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भारत बोंद्रे होते. तर प्रमुख उपस्थितीत आ. श्वेता महाले, रजणीताई शिंगणे उपस्थित यांची उपस्थिती होती. निवडणुकांत आरोप-प्रत्यारोप हे होतच असताच. परंतू, निवडणुकांनतर राजकारण व पक्षीय मतभेद विसरून विकासाला चालना देण्यासाठी एकत्र येणे ही महाराष्टÑाची संस्कृती असल्याचे स्पष्ट करत किंबहुना ही संस्कृती स्व.यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली आहे आणि ही परंपरा चिखलीत या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाली याचा वेगळा आनंद झाल्याचे मत शिंगणे यांनी व्यक्त केले. मी पडत्या फळाची आज्ञा मानून आणि सहकारात काम करणारा माणूस असून माझा पिंडच मुळात सर्वांना सोबत घेवून काम करण्याचा असल्यामुळे पालकमंत्री व राज्याचा मंत्री या नात्याने विकासकामे करताना कोणताही दुजाभाव राहणार नाही, तथापी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना न्याय देण्याचे काम येत्या काळात करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान येत्या काळात जिगाव प्रकल्पाला चालना देण्यासह क्रीडांगणांसाठी लागेल तेवढा निधी पुरविण्याची ग्वाही देखील ना.डॉ.शिंगणे यावेळी दिली. आ. श्वेता महाले यांनी ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पालकत्वातूनच आपल्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरूवात झाली असल्याने विरोधी पक्षाची भूमिका बाजुला ठेवून हा कौटूंबिक सत्कार होत असल्याचे स्पष्ट केले.
भेसळ खपवून घेणार नाही !अन्न व औषधी प्रशासनमंत्री हे पद महाराष्टÑातील जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे. राज्यातील जनतेला भेसळमुक्त अन्न व औषधी मिळायलाच हवे, राज्यात दुधात होणारी भेसळ ही गंभीर बाब आहे. यासाठी गुटख्याप्रमाणेच दूधात भेसळ करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अन्नात भेसळ खपवून घेणार नाही, असा इशारा अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.