- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे. हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे. पर्यावरणावर निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गावे स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असून परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील सांगलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एका कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार त्या तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवचन, भारूड व कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यावेळी सदर कीर्तनकार दिवसा प्रवचन, रात्री भारूड, कीर्तनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत माहिती देवून प्रत्यक्ष वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात किमान ५ रोपाचे रोपण करून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी मोहिमेत सहभागी होणाºया प्रवचनकार, भारूडकार किंवा कीर्तनकारांना वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाणार असून भविष्यात मानधन योजनेसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे.
मुंबई येथे प्रबोधन करणाºया कीर्तनकारांची कार्यशाळा
राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत तालुकानिहाय सहभागी होणाºया व योगदान देणाºया कीर्तनकारांसाठी मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस हजर राहू शकता कां ?, गावागावात जनजागृतीसाठी वेळ देऊ शकता कां ?, ३० दिवस सुरू राहणाºया या उपक्रमासाठी मानधनाची किती अपेक्षा आहे ? याबाबत सविस्तर माहिती संबंधित प्रवचनकार, भारूडकार व कीर्तनकारांनी प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे माहिती द्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेने केले आहे.
वारकरी साहित्य परिषदेने शासनाच्या सहकार्याने राज्यात वृक्ष लागवड व स्वच्छतेबाबत समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील कीर्तनकारांनी सहभागी होवून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे.
-हभप गजानन महाराज गायकवाड, मु.पो.केळवद ता.चिखली, जि.बुलडाणा. अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, जिल्हा शाखा, बुलडाणा.