चिखली : तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात शे. अन्सार शे. शेखजी यांनी पंचायत समितीकडे तक्रार करून विविध आरोप लावले आहेत. दरम्यान या तक्रारींचा आठ दिवसात निपटारा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पं. स. गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या या निवेदनात शे. अन्सार यांनी ग्रामपंचायतीने पात्र लाभार्थ्यांना डावलून इतरांना घरकूल दिले, कोविड १९ मध्ये गावात कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत, पेयजल योजनेत अफरातफर करून तीन व्हॉल्व्हवरून पाणी न देता तीस व्हॉल्व्हद्वारे पाणी देण्यात येते तसेच या योजनेतून पाणीपुरवठा केला जात नाही आदी आरोपांसह पाणीपुरवठा विहिरीवर अधिकृत विद्युत पुरवठा न घेता विजेचा वापर, पथदिव्यांच्या किमतीत तफावत, न बांधलेल्या शौचालयांचे बिल काढणे, नमुना ८ तयार करून पैसे घेऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार, दलित वस्तीच्या मंजूर निधीत सावळा गोंधळ आदी आरोप केले असून या सर्व मुद्यांचा तातडीने निपटारा करावा, अन्यथा भीमसेना सामाजिक संघटनेच्यावतीने आमरण उपोषणाचा इशारा शे.अन्सार शे.शेखजी यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कोट...
पेयजल योजनेतून गरजेनुसार पाणीपुरवठा केला जातो. कोविड काळात सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोबतच सर्व बाबी नियमाकूल आहेत. सदरच सर्व आरोप धादांत खोटे व बिनबुडाचे आहेत.
आर.टी.मुंढे
ग्रामसेवक, किन्होळा