पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी
बीबी : अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीकविमा काढला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर केली होती. मात्र, पीकविम्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही.
‘रोजगार हमी याेजनेची कामे सुरू करा!’
लाेणार : अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता शेतातही कामे नाहीत. तालुक्यासह इतर ठिकाणीही दुष्काळसदृश परिस्थितीमुळे रोजगार उपलब्ध नाही. रोजगार हमी योजनेतूनही केली जाणारी कामे थंड बस्त्यात आहेत.
सिकलसेलविषयी जनजागृतीची गरज
मेहक : आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आजार नियंत्रणानिमित्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा आदी ठिकाणी सिकलसेल आजारानिमित्त माहिती व उपाय याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. अनेकांना या आजाराविषयी माहितीच नसल्याचे चित्र आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ग्राहक त्रस्त
किनगाव राजा : सध्या तेलासह इतर साहित्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. साेयाबीन तेलाचे भाव १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे.
गावठी दारू विक्री सुरूच
सिंदखेड राजा: तालुक्यात गत काही दिवसांपासून अवैध धंद्यांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये वरली मटका, जुगार तसेच गावठी दारूची विक्री हाेत असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे याकडे सध्या दुर्लक्ष असून, परिणामी गावठी दारू विक्री वाढत आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
धामणगाव बढे: परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वर्षाला ३० आगीच्या घटना
बुलडाणा : शहर आणि परिसरात वर्षाला ३० ते ३५ आगीच्या घटना घडत आहेत. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात अग्निशमन दलाचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू आहे. नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात केवळ तीनच कायमस्वरूपी पदे भरलेली असून, आठ पदे रिक्त आहेत.
दरवर्षी होते ५० टक्के वसुली
सिंदखेड राजा: नगरपालिकेंतर्गत ५ हजार मालमत्ताधारकांकडून जवळपास ३४ लाख रुपयांचा कर दरवर्षी वसूल होणे अपेक्षित आहे; परंतु दरवर्षी ५० ते ५५ टक्केच कराची वसुली होते. त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होत आहे.
मृदा तपासणीला काेराेनाचा फटका
मेहकरः राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सन २०१५-१६ पासून मृदा आरोग्य पत्रिका ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृदा नमुने तपासणीचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळे मृदा तपासणीला काेराेनाचा फटका बसला.
अनधिकृत आरओ प्लांटकडे दुर्लक्ष
देऊळगाव राजा : तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत आरओ प्लांट उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे एटीएमही आहेत. परंतु, मोजक्याच लोकांनी आरओ प्लांटसाठी परवानगी घेतलेली आहे. याकडे नगरपालिका व संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
भाजीपाला पिकांवर परिणाम
बुलडाणा : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने भाजीपालावर्गीय पिकांवर अळ्यांसह इतर राेगांनी आक्रमण केले आहे. शेतकऱ्यांना आता भाजीपाला पिकाकडून अपेक्षा आहेत; मात्र राेगराई आल्याने उत्पादनात माेठ्या प्रमाणात घट हाेण्याची शक्यता आहे.
आत्मनिर्भरचा लाभ द्या
बुलडाणा : केंद्र शासनाच्या वतीने फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. शहरातील अनेक फेरीवाल्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पाईपलाईन लिकेजमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न
सिंदखेड राजा : ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी नळाद्वारे आलेल्या अशुद्ध पाण्याचा नागरिकांना वापर करावा लागत आहे. काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने अशुद्ध पाणी प्यावे लागते.