लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शासनाकडून टँकरव्दारे पाणी वितरण करण्यात येत आहे. दरम्यान पाण्यासाठी होत असलेली भांडण आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तात समस्त गावकऱ्यांना आता पाणी कार्डावर पाणी वितरण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना टँकरच्या पाण्याचे वितरण हे पाणी कार्डवर करण्यात येत आहे.चिंचोली परिसरातील विहिरी, बोअरवेल, नाले कोरडेठाक पडले असून पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहेत. मागीलवर्षी ऐन पावसाळ्यातही याठिकाणी पाण्यासाठीचा संघर्ष कायम होता. त्यामुळे सरपंच संजय इंगळे यांच्यासह पं.स. सदस्य, लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक संजय हाके यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयात पाणी टंचाईचा अहवाल सादर केला. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू झाले.मात्र टँकरचे पाणी भरण्यासाठी होत असलेली चढाओढ आणि संघर्ष पाहता याठिकाणी पोलीस बंदोबस्तात पाण्याचे वितरण करण्यात येत होते. तरीही पाण्यासाठीचे होत असलेले भांडण काही थांबेना.सातत्याने होत असलेले भांडण तंटा टाळण्यासाठी नागरीकांना पाणी कार्डवर पाणी वाटप करण्याचा हा उपक्रम प्रभावी उपाय ठरू शकेल म्हणून सर्वानुमते पाणी कार्डवर २०० लिटर पाणी वितरणाचा निर्णय घेण्यात आला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यावर प्रशासनाला यश आले असले तरी या गावामध्ये कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)
चिंचोलीत रेशन कार्डवर मिळते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:05 IST