खामगाव, दि. १५ महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्यावतीने यावर्षी सुध्दा १६ ते २२ मार्च दरम्यान 'जलजागृती' सप्ताह साजरा होत असून या सप्ताहाची सुरुवात १६ मार्च रोजी करण्यात आली. या अनुषंगाने जिगाव उपसा सिंचन विभाग खामगाव अंतर्गत मानेगाव नजीक पूर्णा नदीतील जलपूजनाचा कार्यक्रम होवून जलकलश बुलडाणा येथे रवाना करण्यात आला. जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित या सप्ताहाचा उदघाटन सोहळा १६ रोजी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर होत आहे. या उदघाटन सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व प्रमुख नदींचे जलकलश पूजन होणार आहे. या कलश पुजनासाठी पूर्णा नदीचे जलकलश आणण्याचा कार्यक्रम १५ मार्च रोजी जिगाव उपसा सिंचन विभाग खामगाव अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत मानेगावनजीक पूर्णा नदीपात्राजवळ पार पडला. यानिमित्ताने आदर्श विद्यालय मानेगाव ता.जळगाव जामोद येथून जलरथ व जलदिंडी काढण्यात आली. यानंतर पूर्णा नदीत जलपूजन करुन जलकलश शाळेत आणण्यात आला. या जलदिंडीमध्ये विद्यार्थी, प्रमुख अतिथी व ग्रामस्थांचा मोठय़ा संख्येने उत्स्फूर्त सहभाग होता. यानंतर शाळेचे प्रांगणात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील, नाजुकराव सुलताने, उपसरपंच बाठे, रामकृष्ण कुटे (पाटील), पांडे आदींसह जलसंपदा विभागा तील अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मानेगाव ग्रामस्थ, आदर्श विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगीत घेवून, जलप्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर बंडू पाटील यांनी पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जिगाव उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, श्री.वि.हजारे यांचेतर्फे ह्यछोटा ग्लास पाण्याची बचतह्ण या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून छोटे स्टील ग्लासचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमानंतर पूर्णा नदीचा जलकलश जलजागृती सप्ताहासाठी मानेगाव येथून पुढील कार्यक्रमासाठी बुलडाणाकडे रवाना करण्यात आला आहे.
जलसंपदाच्या वतीने आजपासून ‘जलजागृती सप्ताह’
By admin | Published: March 16, 2017 3:13 AM