बुलडाणा लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणारे शिवणी आरमाळ येथील धरण सिंचन शाखा देऊळगावराजा यांच्या अखत्यारित असून, या धरणावरून उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. शेतीसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे; परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून कालव्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सिंचन शाखा कार्यालय देऊळगावराजा यांच्याकडून पाटचारी नादुरुस्त असल्यास पाणी मागणी अर्ज नामंजूर करण्यात येतो, असा फलक संबंधित विभागाच्या कार्यालयातच लावलेला आहे; परंतु संबंधित विभागाने कालवाच नादुरुस्त असताना ताडपत्री कालव्यात अंथरूण पाणी सोडण्याची पराकाष्टा करून पाणी सोडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यापाठोपाठ २५ फेब्रुवारी रोजी डाव्या कालव्यातून पाण्याचा अपव्यय सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून कपिला नदीवरील बंधारा तुडुंब भरलेला असून या कलव्यामधून पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. संबंधित विभागाकडून कालवा बंद असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्तीअंतर्गत ताडपत्री टाकल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता यांनी दिली. या प्रकाराबाबत स्वप्निल शिंदे यांनी जिल्हाधिकारी व लघुपाटबंधारे विभाग बुलडाणा यांना लेखी निवेदन दिले आहे. बुलडाणा लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कालव्यातून पाण्याचा अपव्यय सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:48 AM