- जयदेव वानखडे जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे.बुलढाणा जिल्हा मधून जळगाव जामोद संग्रामपूर आणि मोताळा या तीन तालुक्यांची वॉटर कप स्पर्धेमध्ये पुन्हा निवड झाली असून या तालुक्यांमध्ये श्रमदानाचे तुफान येऊ लागले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ, सूनगाव, खेळलोण, जामोद, राजुरा,पळशी सुपो, काजेगाव, पळसखेड, निंबोरा बु., निंभोरा खु., वडगाव, पाटण, कुरणगाड खु., टाकळी खाती, आसलगाव इत्यादी गावांसह जवळपास तीस गावांनी सात एप्रिल च्या मध्यरात्री श्रमदान केले. अगोदरच स्पर्धेच्या नादाने झपाटलेले हे लोक रात्री चे केव्हा १२ वाजतात आणि स्पधेर्ला केव्हा सुरुवात होते याची आतुरतेने वाट बघत होते. यापैकी बहुतांश गावातून लोकांनी हातात कुदळ फावडे टिकास घेऊन मशाल रॅली काढली तर,आदिवासी बांडा पिंपळ राजुरा भिंगारा इत्यादी गावात पारंपरिक पद्धतीने ढोल,ताशे वाजवून मिरवणूक काढण्यात आली.या दुष्काळ रुपी राक्षसाला कायमचा हद्दपार करण्यासाठी गावकºयांनी त्याच्यावर घणाघाती वार केले.सध्या राजकीय वातावरण तापले असल्यावर सुद्धा गावकरी यांचा उत्साह कमी न होता वाढतच आहे.लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता यंदा वॉटर कप स्पधेर्चे प्रथम बक्षीस जळगाव जामोद तालुक्याला मिळेल आणि तालुका हा दुष्काळमुक्त होईल. असे एकंदरीत चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी अशाच पद्धतीने गाव पाणीदार करण्याच्या हेतूने गावातील लहान बालके मुले युवक महिला पुरुष वृद्धांपर्यंत सर्व एकत्र आले आणि गावागावात श्रमदान झाले त्याचेच लोन यावर्षी तालुक्यामध्ये पसरले असून यंदा तर संपूर्ण तालुका दुष्काळमुक्त करू अशा निश्चयाने वॉटर कप स्पर्धेतील गावे कामाला लागली आहेत.गेल्या दोन महिन्यापासून गावागावात सभा घेऊन वाटर कप स्पधेर्साठी गावातील लोकांना तयार करण्याचे काम तालुका समन्वयक जिल्हा समन्वयक तथा जल योद्ध्यांनी यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या गावातील तरुण तरुणी आदिवासी यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये स्वत:ला झोकून दिले आहे. मागील वर्षी वनविभागाच्या परिसरात काम करताना आलेली अडचण पाहता यावर्षी रीतसर जल व मृद संधारणाच्या कामा करिता वनविभागाची परवानगी घेऊन वॉटर कप स्पधेर्चा ची कामे सुरू झाली आहेत. एप्रिल चा महिना कडक उन्हाळा असूनही दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावागावात चमू तयार झाले असून भर उन्हात श्रम करीत आहेत.
जळगाव जामोद तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:26 PM