बुलडाणा: जिल्ह्यातील सहा मध्यमप्रकल्पापैकी एक असलेल्या खडकपूर्णा अर्थात संत चोखासागराचे दोन दरवाजे दहा सेंमीने उघडण्यात आले असून या प्रकल्पातून ९७८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी बुलडाणा, जालना आणि हिंगोली, परभरणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन वर्क दरवाजे दहा सेंमीपर्यंत उघडण्यात येऊन हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. २०१३ मध्ये प्रथमच खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा संचय करण्यात आल्यानंतर हिल्याच वर्षी हा प्रकल्प तुडूंब भरल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यासाठी जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागला. तेव्हापासून हा प्रकल्प बहुतांश वेळा मृतसाठ्यामध्येच होता. २०१८ च्या दुष्काळात बुलडाणा जिल्ह्यातील नदीकाठच्या जवळपास ४४ गावात पडलेल्या भयंकर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पातून सहा दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. हा अपवाद वगळता या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नव्हते. किंबहूना हा प्रकल्प गेल्या सहा वर्षात पूर्णभमतेने भरलाच नव्हता. या प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता ही १६०.६६ दलघमी असून प्रकल्पातील मृतसाठ्याची पातळी ही ६० दलघमी आहे. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणाºया पूर्णा नदीवर हा प्रकल्प असून मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचे सावट असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवाच कमी झाला होता. यंदाही तिच परिस्थिती होती. मात्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या धामना, बाणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मधल्या काळात पडलेल्या दमदार पावसामुळे हा प्रकल्पा टप्प्या टप्प्याने भरत गेला असून आजमितीला या प्रकल्पामध्ये ८८.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरण सुरक्षा विभागाच्या निकषानुसार प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला आहे. प्रकल्प जवळपास पूर्णपणे भरल्यामुळे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल कन्ना, उपविभागीय अभियंता राजेश रोकडे व अन्य अभियंता हे २८ सप्टेंबर पासून धरणावरच मुक्काम ठोकून होते. २७ सप्टेंबर रोजीच नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्षात २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास प्रकल्पातून हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
तीन जिल्ह्यातील गावांना सततर्कतेचा इशारा
बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु., डिग्रस खु., टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, मांडेगाव, राहेरी बुद्रूक, ताडशीवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली, दुधा, सामखेडा, तिवखेडा, हनुमंतखेडा, उस्वद, टाकळखेपा, इंचा, कानडी, देवठाणा, वाघाळा, वझर भामटे, सायखेडा (ता. जिंतूर), धानोरा, सेनगावसह अन्य काही नदीकाठच्या गावांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोन शहरांसह ४४ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
मराठवाड्याच्या सिमेलगत असलेल्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या दोन शहरांसह बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातील जवळपास ४४ गावांचा खडकपूर्णा प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या तीनही तालुक्यात असलेलेले एकूण तीन कोल्हापुरी बंधारेही नदीपात्रात होणाºया विसर्गामुळे भरणार असून मायनर टँक स्वरुपातील हे बंधारे भरल्यास गावातील पाणीसमस्याही बहुतांशी निकाली निघण्यास मदत मिळणार आहे.