किनगाव जट्टू : परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले खळखळून वाहिले. कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्याने तलावाचे स्वरूप आले होते. नारळी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने दोन तास रहदारी खोळंबली होती. नारळी नदीच्या पुलावरून पाणी जात असताना एकमेकांचा हात धरून काहींनी जीवघेणा प्रवास केला. तर काही शेतकऱ्यांनी या वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस केले.
बळीराजा जोरदार पावसाची वाट पाहत असताना बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान अडीच तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरूवारी सुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे कित्येक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतीबांध फुटल्याने शेताला तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक वाचवण्याकरिता ठिंबक सिंचनाचा आधार घेत पाणी देणे सुरू केले होते. त्यांचे ठिंबक सिंचन एका ठिकाणी जमा झाले.
परिसरातील वसंत नगर, देवा नगर, खापरखेड लाड, सावरगाव तेली परिसरातील नदी नाले दुथडी भरून खळखळून वाहिले. किनगाव जट्टू गावाजवळी खापरखेड लाड रस्त्यावरील नारळी नदीवरील फुल पाण्याखाली आल्यामुळे दोन तास रहदारी खोळंबली होती. पुलावरून पुराचे पाणी असल्याने शेतकरी शेतमजूर अडकले होते. किनगाव जट्टूचा बाजार असल्याने अचानक पाऊस आल्यामुळे व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
खापरखेड येथील नागरिकांना जाण्याकरता पुलावरून पाणी असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. या पुलाची उंची वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. उशिरा का होईना जोरदार पाऊस आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.