दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे. खडकपूर्णा नदीवरील तीनही कोल्हापूरी बंधार्यामध्ये जवळपास एक दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ््यातील किमान आगामी दीड महिन्याची पिण्याच्या पाण्याची नदीकाठच्या गावांची चिंता मिटली आहे. नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची समस्या पाहता प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चार मे रोजी संत चोखा सागरातून सहा दलघमी पाणी खडकपूर्णा नदीत सोडले होते. वास्तविक कोरड्या पडलेल्या नदीत पाणी सोडणे ही मोठी जोखीम होती. त्याउपरही प्रशासाने पाणीसमस्येची गंभीरता पाहता नदी पात्रात पाणी सोडले होते. सहा मे रोजी पर्यंत हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक गणल्या जाणार्या देवखेड (लिंगा) कोल्हापूरी बंधार्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. २८ घनमीटर प्रती सेकंद या वेगाने हे पाणी सोडण्यात आले होते. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या गावांमध्ये आता नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे. त्यामुळे टंचाई काळात पाण्याचा मोठा अपव्य होत असतााही ४४ गावांसाठी पाणी सोडून प्रशासनाने त्यांची माणूसकी दाखवली असली तरी आता या गावांवर पाणी जपून वापरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नाही म्हणायला नदी काठच्या विहीरींनाही प्रकल्पातून सोडलेल्या या पाण्याचा मोठा फायदा झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
तीनही बंधाऱ्यांत ०.७५ दलघमी जलसाठा
खडकपूर्णा नदीपात्रामध्ये निमगाव वायाळ, दुसरबीड आणि देवखेड (लिंगा) हे तीन कोल्हापूरी बंधारे आहे. या तीनही बंधार्यांची पाणीसाठवण क्षमता ही एक दलघमी आहे. मात्र उन्हाळ््याची परिस्थिती व सोडलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्य पाहता ०.५ मीटर लांबीच्या लाकडी फळ््या टाकून हे ०.२५ दलघमी प्रत्येकी पाणीसाठा या तीनही बंधार्यामध्ये करण्यात आला आहे. उर्वरित पाणी हे जमीनीत झिरपले तर काही पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.