लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मूग, उडिदाचे पीक अज्ञात रोगाने हातचे गेले. काही प्रमाणात आलेले पीक अतिपावसामुळे मातीत गेले. तरीही त्यानंतर जिल्ह्यातील पिकांची पैसेवारी ६८ निश्चित झाल्याने आता त्या पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.चालू हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या. तसेच सप्टेंबरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. या पावसामुळे घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने केले. त्यानंतर महसूल विभागाने जाहिर केलेल्या पैसेवारीमुळे त्या पीक नुकसानीची मदत मिळेल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रशासनाने जाहीर केल्यानुसार बुलडाणा तालुक्याची पैसेवारी ७४, चिखली-७१, देऊळगाव राजा-६८, मेहकर-७२, लोणार-६२, सिंदखेड राजा-६४, मलकापूर-६४, मोताळा-७१, नांदुरा-७१, खामगाव-६९, शेगाव-६५, जळगाव जामोद-६२, संग्रामपूर-७० या प्रमाणे नजर अंदाज जाहिर झाला आहे.