उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५२ टक्के गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८२ टँकरची गरज पडणार असून, त्यावर सहा कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. यासोबतच ५३८ गावांत ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, १७३ गावांत नव्याने विंधन विहिरी घ्याव्या लागण्याची शक्यता असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे जवळपास ९४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसानेही पिकांना फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र या उपरही जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी ६६७ अर्थात ५२ टक्के गावांत पाणीटंचाईची शक्यता कृती आराखड्यातून स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.