खामगाव: शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईसंदर्भात अंबिका नगरातील महिलांनी मंगळवारी दुपारी १.३० वाजता पालिकेवर धडक दिली. यावेळी महिलांनी पाणी पुरवठा सभापतींची भेट घेत प्रभागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली.
खामगाव शहरातील घाटपुरी भागातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग न झाल्याने, परिसरातील महिलांनी मंगळवारी पालिकेवर धडक दिली. यावेळी पाणी समस्या सोडविण्यासोबतच वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर शोभा तोटे, रेणुकाबाई ढोले, शिला गावंडे, उर्मिला भवर, पुष्पा जाधव, मंदाबाई बिबे, ज्योत्सना सोनोने, संगिता जोशी, विमल किरकाळे, शीला देशमुख, अनिता हुरसाड, शोभा वक्टे, मंगला काटे, लिला भारसाकळे, निर्मला व्यवहारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
सभापतींनी दिले आॅटो भाडे!
पाणी समस्येसंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांच्या समस्या पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा यांनी जाणून घेतल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर काही महिलांनी पालिकेत यायला आॅटोभाडे लागत असल्याने, येणे परवड नसल्याची तक्रार केली. त्यावेळी पाणी पुरवठा सभापती यांनी मोर्चेकरी महिलांना आॅटोभाड्यासाठी १०० रुपये देत, तक्रार निवारण करण्याचे आश्वासन दिले.