लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वर्षीचा जिल्ह्याचा पाणीटंचाईचा कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ६८७ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने ९५६ उपाययोजनांची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका घेण्यासाठी १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांची आराखड्यात तरतूद करण्यात आली असून २३० उपाययोजना त्यातून करण्यात येणार आहेत. ६१ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी दोन कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, २१ गावांतील योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.याव्यतिरिक्त ५३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ७५ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
दोन तालुक्यांत आतापासूनच टंचाईखारपाण पट्ट्यातील दोन तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा तालुक्यात त्यामुळे नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड आणि शेगाव तालुक्यात चिंचखेड आणि जानोरी येथे त्यामुळे विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.
८२ गावांत टँकरची गरजयावर्षी ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, ८२ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यादृष्टीने ६ कोटी ८४ लाख रुपयांचे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. तूर्तास जिल्ह्यात एकही पाण्याचे टँकर सुरू नसल्याचे टंचाई निवारण विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१८-२०१९ या वर्षी जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई होती. त्या तुलनेत यंदा टंचाईचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे, असे सूत्रांनी सांगितले.