खामगाव : तांत्रिक अडचण आणि भारनियमनामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सहा दिवसांआड होणारा पाणी पुरवठा चक्क १२ व्या दिवसांपर्यंत पोहोचल्याने, नागरिक चांगलेच मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे.
सुमारे सव्वालाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी गेरू माटरगाव येथे पंपींग हाऊस कार्यान्वित करण्यात आला आहे. या पंपींग हाऊसवरून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील जळका भंडग येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यात येते. तेथून घाटपुरी नाक्यावरील पाण्याच्या टाकीद्वारे शहराच्या विविध भागात पाणी पोहोचविल्या जाते. मात्र, भारनियमनामुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. गेरू माटरगाव येथील धरणावर तब्बल ८-९ तास भारनियमन होत असल्याने विलंबाने पंपींग होत आहे. परिणामी, टाक्या देखील विलंबाने भरल्या जाताहेत. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पूर्वी ६-७ दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र, आता ऐन दिवाळीत १२ दिवसानंतर पाणी पुरवठा केल्या जातो. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झालेत.
बुस्टरपंपाचाही मुद्दा ऐरणीवर!
खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईन गळतीसोबतच वामन नगरातील बुस्टर पंपाचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील बुस्टर पंपावरील १ पंप गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे एकच पंप या ठिकाणी कार्यान्वित आहे. हा पंप नादुरूस्त झाला की, शहराच्या पाणी पुरवठ्यात तांत्रिक अडचण निर्माण होते.
मजीप्रा आणि पालिकेचे दुर्लक्ष!
शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधीकरणासोबतच पालिका प्रशासनाकडूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये ही समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.