- अनिल गवई
खामगाव : शहराच्या पाणी आरक्षणात कपात करण्यात आली. परिणामी, ऐन हिवाळ्यातच खामगाव शहरातील पाणी टंचाई तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. पाणी आरक्षण बैठकीला मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंत्यांच्या अनुपस्थितीमुळे खामगावर हे ‘जल’संकट ओढवल्याचे समजते.
जिल्ह्यातील जलसाठ्यातील पाणी आरक्षणाबाबत महत्वपूर्ण बैठक बुलडाणा येथे पार पडली. या बैठकीच्या दिवशीच मुंबईत गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजीत पाटील यांनी महत्वपूर्ण बैठक बोलाविली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे मुंबईत होते. त्याचवेळी बुलडाणा येथे पाणी आरक्षणासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला खामगाव पालिकेकडून तांत्रिक माहिती असलेला अधिकारी उपस्थित राहू शकला नाही. कार्यालयीन पर्यवेक्षक राठोड हे केवळ औपचारीकता म्हणूनच या बैठकीला उपस्थित राहीले. परिणामी, गेरू माटरगाव येथील धरणात ३.४५ दशलक्ष घनमीटर उपलब्ध पाणी साठा आहे. यापैकी मागणीच्या तुलनेत निम्मे म्हणजेच १.१७ द.ल.घ.मी. पाणीच खामगाव शहरासाठी आरक्षीत करण्यात आले. तर याच धरणातून नांदुरा शहराला १.८५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षीत करण्यात आले. नांदुरा शहराला पाणी आरक्षण बैठकीत मागणीच्या तुलनेत शंभरटक्के आरक्षण दिले गेले.
खामगाव शहराला सापत्न वागणूक!
नांदुरा शहर आणि एमआयडीसीला मागणीच्या तुलनेत शंभर टक्के तर खामगावला निम्मे पाणी आरक्षीत केले गेले. खामगाव शहराला प्रशासनाकडून सापत्न वागणूक दिली गेली. असे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
असे ठरले पाणी आरक्षण!
शहर मागणी मिळालेले आरक्षण
खामगाव २.८७ १.१७(द.ल.घ.मी.मध्ये)
नांदुरा १.८५ १.८५
एमआयडीसी ०.४० ०.४०
गेरू माटरगाव येथील धरणातून समप्रमाणात पाणी आरक्षण मिळावे. मागणीच्या तुलनेत पाणी आरक्षण मिळविण्यासाठी पालिका स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक असल्याने, पाणी आरक्षण बैठकीला बुलडाणा येथे उपस्थित राहू शकलो नव्हतो.
- नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.