देऊळगाव राजा तालुक्यात एकूण ४८ गट ग्रामपंचायतींसह काही स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये एकूण ६२ गावांची संख्या आहे. तालुक्यात सर्वांत मोठे जलस्रोत म्हणजे खडकपूर्णा धरण आहे. परंतु प्रशासनाचा नियोजनाचा अभाव व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे धरणकाठच्या गावांसह खडकपूर्णा नदीकाठच्या गावांनासुद्धा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुका टँकरमुक्त असला तरी विहीर अधिग्रहन केलेल्या गावांची संख्यासुद्धा मोठी असल्याचे चित्र आहे. यामध्ये काही गावे तर खडकपूर्णा बुडीत क्षेत्रातीलसुद्धा आहेत. त्यामध्ये सीनगाव जहांगीरसारख्या गावाचा उल्लेख करता येईल.
--या गावांमध्ये झाले विहिरींचे अधिग्रहण--
तालुक्यातील भिवगाव बुद्रूक, पिंपळगाव, किन्हीपवार, बोराखेडी बावरा, पळसखेड झाल्टा, गिरोली बुद्रूक, गिरोली खुर्द, बायगाव बुद्रूक, जुमडा, पिंपळगाव बुद्रूक, जांभोरा, आंभोरा, वाणेगाव, सेवानगर (अंढेरा), पारधी वस्ती (अंढेरा), सुलतानपूर, सावखेड नागरे, पाडळी शिंदे, तुळजापूर, निमखेडा यासह अन्य काही गावांचा समावेश आहे.
--टँकरसाठी प्रस्तावच नाही--
तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नाही. अधिग्रहण केलेल्या विहिरींची मुदत ३० जून २०२१ पर्यंत आहे. त्यानंतरही गरज भासल्यास तथा ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आल्यास त्याला मान्यता देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
--विहिरी अधिग्रहणाचे २० प्रस्ताव पडून--
विहीर अधिग्रहणाचा अधिकार तालुका पातळीवर देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीकडून आलेला प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर तहसील कार्यालयाला पाठविला जातो आणि मागणीनुसार त्याला तहसीलदार मान्यता देतात. परंतु विहीर अधिग्रहणाच्या व्यतिरिक्त तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींकडून २० प्रस्ताव गेल्या एक महिन्यापूर्वी प्राप्त झाले आहेत. त्यांची पडताळणी करून हे प्रस्ताव तहसील कार्यालयाला पाठविण्यात आले. परंतु त्याला मान्यता मिळाली नसल्याचे पाणीटंचाई विभागाचे कक्ष प्रमुख विजय सावळे यांनी सांगितले.