- सुधीर चेके पाटील
चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यात यंदा सर्वच जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असल्याने येणाºया काळात गावांच्या संख्येत वाढ होवून तालुक्याला प्रथमच अत्यंत तीव्रतेच्या पाणीटंचाईचा सामना करावा लाागणार आहे. यानुषंगाने व संभाव्य पाणी टंचाईचा नियोजनपूर्वक सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अश्या तीन टप्प्यांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात केवळ ६२ टक्के पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत कोरडेच राहीले आहेत. तथापी भूगर्भातील पाणीपतळी देखील कमालीची खालावली आहे. कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सर्वच जलाशयातील पाणी यंदा केवळ पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. तालुक्यातील प्रमुख जलाशयांपैकी पेनटाकाळी प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. तर खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक असून जिवंत साठा शून्य आहे. याशिवाय ब्राम्हणवाडा, पाटोदा, अंचरवाडी, मिसाळवाडी या मध्यम प्रकल्पासंह इतर लहान प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा यंदा झालेला नाही. या प्रकल्पातील हा अत्यल्प पाणीसाठा आणि सद्यस्थितीतच तालुक्यातील तब्बल ८० गावांमध्ये असलेली पाणीटंचाईची आजची ही स्थिती आहे. यावरून येणार्या काळातील बिकट स्थितीचा अंदाज यावा. (तालुका प्रतिनिधी)
टंचाई निवारणार्थ ८० गावात १८२ योजना
तालुक्याला आतापासून भेडसावणाºया पाणीटंचाई निवाराणार्थ तालुका प्रशासना कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ च्या पहिल्या टप्प्यात तब्बल ८० गावांचा समावेश असून या गावातील पाणीटंचाई निवारनार्थ १८२ योजना उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ च्या दुसºया टप्प्यात ७८ गावांचा समावेश आहे तर एप्रिल ते जून २०१९ च्या तीसºया टप्प्यात २० गावांचा समावेश आहे.
१२३ विहिरींचे होणार अधिग्रहण
८० गावातील पाणीटंचाई निवारणार्थ पहिल्या टप्प्यात २४ विहिरींचे खोलीकरण करणे, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण, २८ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा, ७ गावातील नळयोजनेची विशेष दुरूस्ती, १ विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती, ३१ विंधन विहिर/ कुपनलिका घेणे आणि १६ ठिकाणी तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तवित करण्यात आली आहे. तर दुसºया टप्प्यात ११ विहींरींचे खोलीकरण, ४३ विहींरींचे अधिग्रहण, १८ गावात टँकर, २ ठिकाणची नळयोजना पूर्ण करणे, ३ नळयोजना दुरूस्ती, २३ बोअर घेणे व ४ तात्पुरती पूरक नळयोजना आणि तिसºया टप्प्यात ८ विहींरींचे खोलीकरण, ५ विहींरींचे अधिग्रहण, १३ गावात टँकर, ४ बोअर घेणे व ३ तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यानुसार यंदा १२३ विहिरींचे अधिग्रहण तर ५९ टँकरव्दारे पाणीपुरवठा होणार आहे.