बुलडाणा : चिखली व बुलडाणा तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या ११७ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. बुलडाणा तालुक्यातील ६५ व चिखली तालुक्यातील ११२ गावांचा यात समावेश आहे. सोबतच या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ५०० मीटर अंतरामध्ये कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करता येणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी स्पष्ट केले आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे प्रभाव क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या एक किलोमीटर परिसरातील विहीर तात्पुरती बंद करणे, पाणी दूषित होईल, असे कृत्य कुणीही करणार नाही. तसेच अधिनियमातील तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणीटंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणाला मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.