येळगाव धरणात चार दलघमी पाणीसाठा:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 6:01 PM
बुलढाणा जिल्हा मुख्यालयाची पाण्याची चिंता मिटली.
बुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाºया बुलडाणा जिल्ह्यात २३ आणि २४ एप्रिल रोजी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाण्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. दरम्यान सध्या उपलब्ध असलेले पाणी हे शहरास आणखी साडेतीन महिने पुरेल ऐवढा जलसाठा सध्या येळगाव धरणात उपब्ध झाला आहे.सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरास येळगाव धरणावरून पाणीपुरवठा होता. मात्र प्रकल्पातील जलसाठा हा गेल्या वर्षीच्या अवर्षणामुळे मृतसाठ्यात गेला होता. त्यामुळे अवघा महिनाभर पाणी पुरेल, असा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात होता. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा हा गेल्या सहा वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे बुलडाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय असा प्रश्नही निर्माण होत होता. मधल्या काळात बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणावर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रणकंद झाले होते. बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्राची सफाई करून उपलब्ध पाणी हे शुद्ध स्वरुपात नागरिकांना मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका प्रशासनाच्या उदीसन धोरणासंदर्भात थेट बैठकीमध्येच ताशेरे ओढले होते. त्यासाठी सनियंत्रण समितीही नियुक्त केल्या गेली होती. तहसिलदार संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र प्रकल्पातील जलसाठा संपुष्टात आला तर काय? असा प्रश्न होता. शहरासाठी पेनटाकळी प्रकल्पावरही पाणी आरक्षण होते. पर्यायी जलवाहिनीही उपलब्ध होती. मात्र पेनटाकळी प्रकल्पातील पाणीसाठीही सहा वर्षाच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर पोहोचला होता तर खडकपूर्णा प्रकल्प तीन वर्षापासून मृतसाठ्यात आहे. शहरात जवळपास १४ हजार नळ जोडण्या आहेत.या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात पावसाचे आगमनही झालेले नव्हेत. मात्र २३ आणि २४ जून रोजी येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला दमदार पाऊस आणि पैनंगगा पूनर्रूजिवन प्रकल्पामुळे झालेले नदीचे खोलीकरण यामुळे पहिल्या पावसातच पैनगंगा नदीला पुर गेला व येळगाव धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. वर्तमान स्थितीत प्रकल्पात चार दलघमी पाणीसाठा आहे. जवळपास तीन दलघमी पाणी या प्रकल्पात वाढले आहे. परिणामी आगामी साडेतीन महिने बुलडाणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.मृत साठ्यात असलेल्या येळगाव धरणात वर्तमान स्थितीत चार दलघमी पाणीसाठा झाला आहे. सुमारे साडेतीन महिने तो शहरास पुरेल.(राहूल मापारी, पाणीपुरवठा अभियंता, बुलडाणा पालिका)