- अझहर अलीसंग्रामपुर : अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेले हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात तीन दिवसापासुन वाढ होत आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हा पासुन धरणाच्या जलसाठ्यात वाढ होताना दिसत नव्हती. चार दिवस अगोदर या धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यात आता झपाट्याने वाढ होताना दिसत असुन, तीन दिवसामध्ये १२ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली. धरणामध्ये पाण्याची आवक वाढतीवर आहे. गत पाच दिवसापासुन पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत असुन धरण परीसरातही वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जल साठ्यात वाढ होत आहे. वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. या धरणातुन अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपान पट्टयातील संग्रामपुर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वान नदी पात्रावर उभारण्यात आलेले हे धरण शेकडो गावातील लाखो लोकांची तहान भागवत आहे. यावर विज निर्मिती संच उभारण्यात आला असुन त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलो मेगावँट आहे. येथे एक हजार किलो मेगावँट विज निर्मिती करण्यात येत असुन अकोला जिल्ह्यातील हिवरखेड उप केंद्राला विज पुरवठा करण्यात येतो. तसेच अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणातुन पाठाच्या माध्यमातुन पाणी मिळते. त्यामुळे वारी हनुमान येथील धरण या भागातील जनतेसाठी जिवनदायी ठरत आहे. धरणामधील जलसाठ्यात वाढ होत असल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणि उपलब्ध होणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतुन वाहत येत असलेली वान नदीचा उगम मध्यप्रदेशातुन असल्याने पर प्रांतात पाऊस पडल्यास या नदीला मोठ्या प्रमाणात पाणि येते सद्यास्थिती मध्यप्रदेशासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धरण परीसरात अशाच प्रकारे पाऊस पडला तर वारी येथील धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. या धरणात सोमवार पासुन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असुन बुधवारी सकाळ पर्यंत धरणामध्ये ३६.८४ टक्के जलसाठा जमा झाला असल्याची माहीती वान प्रकल्पाकडुन प्राप्त झाली आहे.
वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:29 PM