लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सुमारे २ लाख १९ हजार लोकसंख्या असलेल्या बुलडाणा तालुक्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असून ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, १७ गावांतील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पैनगंगा नदीचा उगम असलेल्या व काळ्या पाषाणाचा भाग असलेल्या तालुक्यातील या नदी क्षेत्रालगतच्या भागात प्रामुख्याने टंचाईची दरवर्षी तीव्रता जाणवत असते. त्यातच मधल्या काळात या पैनगंगा नदीवर १ दलघमी क्षमतेचे ८ मायनर टँक उभारण्यात आल्याने अलीकडील काळात या भागातील टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यात यावर्षी तीन गावांची भर पडली आहे.बुलडाणा तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १ कोटी ९८ लाख रुपयांचा आहे. यावर्षी तालुक्यातील ९६ गावांपैकी ५६ गावांना टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. विहीर अधिग्रहणासाठी यंदा २८ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रसंगी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता पंचायत समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यातील यावर्षी किमान १३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापैकी सध्या ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.
२५ गावात विंधन विहिरी प्रस्तावितबुलडाणा तालुक्यातील ९६ गावांपैकी २५ गावांमध्ये यावर्षी विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अद्याप त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पावले टाकली गेली नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. विंधन विहिरीसाठी यंदा तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठासध्या बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, देव्हारी, पिंपरखेड, सावळा, सुंदरखेड आणि भादोला या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरसाठीच यंदाच्या कृती आराखड्यात सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.