बुलडाणा तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १ कोटी ९८ लाख रुपयांचा आहे. यावर्षी तालुक्यातील ९६ गावांपैकी ५६ गावांना टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. विहीर अधिग्रहणासाठी यंदा २८ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रसंगी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता पंचायत समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यातील यावर्षी किमान १३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापैकी सध्या ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.
--या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा--
सध्या बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, देव्हारी, पिंपरखेड, सावळा, सुंदरखेड आणि भादोला या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरसाठीच यंदाच्या कृती आराखड्यात सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.
--२५ गावात विंधनविहिरी प्रस्तावित-
बुलडाणा तालुक्यातील ९६ गावांपैकी २५ गावांमध्ये यावर्षी विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अद्याप त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पावले टाकली गेली नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. विंधन विहिरीसाठी यंदा तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
--भूजल पातळी कमी--
बुलडाणा तालुक्याचा बहुतांश भाग हा अजिंठा पर्वत रांगांच्या मेजर बेसीन बाऊंडरीवर आहे. त्यामुळे बुलडाणा तालुक्यात पडणारा बहुतांश पाऊस जमिनीत झिरपण्याऐवजी वाहून जातो. त्यामुळे तुलनेने अधिक पाऊस पडूनही तालुक्यात उन्हाळ्यात टंचाई जाणवते. गेल्या दोन वर्षापूर्वी पैनगंगा नदीचे खोलीकरण करण्यात येऊन जुन्या गावतलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आल्याने टंचाईच्या दाहकतेत सध्या कमी आली आहे.