धाेत्रा नंदई : येथून जवळच असलेल्या वाकी बु. येथे दूषित पाण्याचा पुरवठा हाेत आहे. ६ जानेवारी राेजी गावात पक्ष्यांचे पंख आणि मांसाचे तुकडे असलेल्या पाण्याचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
वाकी बु. येथे ग्रामपंचायतच्या स्वतंत्र याेजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. विहिरीचे पाणी जलकुंभात साेडून तेथून संपूर्ण गावाला त्याचा पुरवठा करण्यात येताे. साठवणूक हाेत असलेल्या जलकुंभाला कुठलेही झाकण नसल्याने त्यामध्ये पक्षी पडतात. अनेकवेळा मृत झालेल्या पक्ष्यांचे पंख आणि मांसाचे तुकडे पाण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आठवड्यातून जलकुंभाची स्वच्छता करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे जलकुंभाला तातडीने झाकण लावून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अविनाश काकड, बालराजे नागरे, गजानन काकड, बालू सानप, रवि काकड, लिंबाजी काकड, लघू काकड, सरस्वती नागरे, रेणुका नागरे आदींसह इतरांनी केली आहे.
गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रयत्न आहे. या प्रकाराची चाैकशी करून जलकुंभाची स्वच्छता करण्यात येईल.
सपना भालेराव, सरपंच, वाकी