साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या राताळी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसांपासून जळाले आहे़ त्यामुळे, गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे़ जळालेेले राेहित्र तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे़
राताळी येथील रोहित्र नेहमी-नेहमी जळण्याचे सत्र सुरूच असून गेल्या आठ दिवसांपासून येथील रोहित्र पुन्हा जळाल्याने नागरिकांना कडक निर्बंधांच्या काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे रोहित्र जळाल्याने गाव अंधारात बुडाले असून गावाला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिठाच्या गिरण्याही बंद झाल्याने रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राताळी येथे गावठाणातील दलित वस्तीमधील आणखी एक रोहित्र मंजूर आहे. ते आणखी एक मंजूर रोहित्र जर मिळाले तर सदर रोहित्रावरील दाब कमी होऊन रोहित्र जळण्याची समस्या राहणार नाही, असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास लव्हाळे यांनी व्यक्त केले आहे. रोहित्र जळाल्याने गावात पाणीपुरवठा बंद, पिठाची गिरणी बंद, टी.व्ही. बंद, जनावरांना पाणी पाजण्याची गैरसोय होत असून दुसरीकडे निर्बंध़ त्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तेव्हा लवकरात लवकर हे जळालेले रोहित्र बदलून मिळावे व मंजूर असलेले आणखी एक रोहित्र लवकरात लवकर बसवून जुन्या रोहित्रावरील दाब कमी करावा, अशी मागणी राताळी येथील सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी वीजवितरण अधिकारी यांना केली आहे.