देऊळगाव राजा - खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील २२ गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शनिवारी रात्री निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात ठराव घेण्यात आले. या ठरावाला ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शविल्याने तालुक्यात खडकपूर्णाचे पाणी पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर धरणाची निर्मिती झाली असून देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील गावांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे. परंतू पाण्यापासून तीच गावे वंचित असताना जालना जिल्ह्यात पाणी पळवल्या जात असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या पचनी पडली नाही, खडकपूर्णा पाणी बचाव संघर्ष समितीने गावागावात जाऊन जनजागृती केल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या आणि त्याचाच परिणाम शनिवारी रात्री दिसून आला. तालुक्यातील देऊळगाव मही सिनगाव जहांगीर, खल्याळ गव्हाण, गारगुंडी, मेहुणा राजा, रोहणा, टाकरखेड भागीले, मंडपगाव, चिंचखेड, सुलतानपूर, गारखेड, पाडळी शिंदे, पांगरी माळी, निमगाव गुरू, वानेगाव, डिग्रस, पिंपळगाव सुरा यासह एकूण २२ गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले.पुतळा दहणापूर्वी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा पार पडल्या. त्यामध्ये प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला विरोध दर्शवून ती रद्द करण्यात यावी, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातून योजनेची पाईपलाईन जाणार आहे, त्या वनजमिनीमधून प्रशासनाने परवानगी देऊ नये, असा ठराव सुद्धा एकमुखाने घेण्यात आला. तसेच योजना मंजूर झाल्यानंतर दिशाभूल करून ज्या ग्रामपंचायतींचे ठराव घेतले होते, त्या ग्रामपंचायतींनी सुद्धा दुस-यांदा ग्रामसभेत ठराव घेऊन प्रखर विरोध कायम ठेवला आहे. आज ऐतिहासिक मोर्चासोमवारला देऊळगाव राजा शहरात याच प्रश्नावरती ऐतिहासिक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन विरुद्ध जनता असा थेट संघर्ष पेटण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या बुधवारी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे काम स्थनिकांनी बंद पाडल्यानंतर गुरुवारी पुन्हा ते काम सुरू केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. नियोजित विहिरीचे काम सुरूगुरूवारला सकाळी चार पोकलॅण्ड, पाच ते सहा ब्लास्टिंग ट्रॅक्टर व मजुरांच्या मदतीने खडकपूर्णा धरणपात्रातील नियोजित ठिकाणी विहीर खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या ९२ गावांसाठी खडकपूर्णा धरणातून ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली व लगेच कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगितले. धरणपात्रात चरी खोदुन विहिरीच्या खोलीकरणाचे काम देखील युध्द पातळीवर सुरू केले.
खडकपूर्णाचे पाणी पेटले : २२ गावांमध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 7:18 PM