मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारा माेटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ जूनपासून ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले हाेते. नगरपंचायतच्या वतीने मिळालेल्या लेखी आश्वासनाने हे ठिय्या आंदाेलन मागे घेण्यात आले़
शहरातील लोकसंख्येने दहा हजारांचा आकडा केव्हाचाच पार केला आहे. शहराला येथील नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु नगरपंचायतमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने येथे आठवड्यातून एकाच दिवशी शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वास्तविक पाहता येथील नगरपंचायत प्रशासनाने नियोजन केल्यास शहराला आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो; परंतु नियोजनाअभावी ते शक्य होत नाही. त्यातच मोटार पंप जळून पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणारे मोटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानादेखील शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माेताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी दाेन दिवसांत माेटार दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे घाटे यांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतले.
एकाच माेटार पंपाने पाणीपुरवठा
ग्रामपंचायत काळापासून एकाच मोटार पंपावरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील नगरपंचायत प्रशासनाने शहरासाठी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. जेणेकरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपात काही बिघाड झाल्यास; अथवा मोटार पंप जळाल्यास शहरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करता आला असता, यासाठी मागील काळात येथील नागरिकांनी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करण्याची मागणीदेखील केली आहे; परंतु नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही़
पिवळसर पाण्याचा पुरवठा
शहराला नगरपंचायतीमार्फत होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नळाद्वारे पिवळसर रंगाचा, तसेच जंतुयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे धरणातून येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सरळ-सरळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा हा अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देत आहे.