खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे. याबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर मुख्यसचिव, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना माहिती देण्यात आली त्यांच्याही चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, १ ते १६ जानेवारीच्या कालावधीत मेहकर तालुक्यातील १४६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. त्यानंतर २१ ते २७ जानेवारी दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील ६६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. यामध्ये दूषीत पाणी पुरवठ्यामुळे तालुक्यातील ३००-४०० जणांचा किडनी आजाराने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये सोनाळा १००, कळमखेड ४०, वरवट खंडेराव ३०-४० तर लाडणापूरमध्ये १०० जणांचा समावेश आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यामध्ये आरोग्य विषयक सुविधांचा अभाव असल्याचेही समोर आल्याचे माजी मंत्री सावजी यांनी नमूद केले. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून काही ठिकाणी पाईपलाईनचीही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार की नाही? याबाबत काही शाश्वती नाही. तथापि, या भागातील ४० गावांतील रस्त्यांचीही अतिशय दयनिय अवस्था झाली असून, या रस्त्याने मोटार सायकल चालविणेही कठीण असल्याचेही सावजी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, चंद्रकांत माने, संजय तारापुरे, डॉ. अविनाश झाडोकार, अॅड. गायगोळ आदींची उपस्थिती होती.