देऊळगावराजा (जि. बुलडाणा): येथे प्रवाशांसाठी बांधलेली पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली आहे. मागील अनेक वर्षांपासून या टाकीत पाणी नसल्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते. याकडे आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसत आहे. देऊळगावराजा बसस्थानकाहून तालुक्यातील ग्रामीण भागातून रोज हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, प्रवासी शहरात ये-जा करतात. शासकीय कार्यालये असल्याने कामानिमित्त येणार्या प्रवाशांची संख्या फार मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बसस्थानकार गेल्या कित्येक वर्षांपासून मुत्रीघरे, शौचालय व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुत्रीघराची व्यवस्था नसल्यामुळे बसस्थानक परिसरात कुठेही लघुशंका उरकली जाते. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली आहे. त्यातच परिसरातील कचरा येथेच टाकण्या त येत असल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येते. या परिसरात आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने बसमधून उतरलेला प्रवासी प्रथम पाण्याचा शोध घेतो; मात्र जलकुंभ नसल्याने त्याला पाणी मिळत नाही. नाइलाजास्तव १५ ते २0 रुपये खर्च करून बाटलीबंद पाणी प्रवाशांना घ्यावे लागते. बसस्थानकावर मागील २0 वर्षांपासून पुरुषोत्तम बन्सीलाल भारुका हे अग्रसेन महाराजांच्या नावाने पाण पोई चालवत आहेत; पण एसटी आगार व्यवस्थापनामार्फत आजपर्यंंत प्रवाशांसाठी पिण्याचे पाणीची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
पाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू
By admin | Published: March 24, 2015 1:13 AM