बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. मात्र, अनेक भागातील पाण्याची तपासणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांना आपले पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची माहिती मिळत नाही.
बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून २७ वार्डांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येते. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून १२ पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. प्रत्येक साेमवारी वेगवेगळ्या प्रभागातून पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. यामध्ये अनेक प्रभागांचा क्रमांक उशिराने लागत असल्याने त्या भागातील नागरिकांना पाणी दूषित आहे किंवा नाही याची माहितीच मिळत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाययाेजना करण्यात येतात. दूषित पाणी असल्यास लिकेज काढून पुन्हा त्या पाण्याची तपासणी करण्यात येते. नगरपालिकेच्या वतीने एकाच प्रभागातून १२ नमुने गाेळा करण्यात येतात. त्यामुळे इतर प्रभागातील पाण्याचे काय असा प्रश्न उपस्थित हाेताे. त्यामुळे प्रत्येक भागातून नियमित पाण्याचे नमुने घेतल्यास पाण्याविषयी माहिती मिळेल व त्यावर नगरपालिकेला उपाययाेजना करता येतील.
एका प्रभागातून घेतले जातात १२ नमुने
नगरपालिकेच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून नागरिकांच्या घरात आलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. महिनाभरात ४० नमुने घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने जवळपास ४८ नमुने घेण्यात येऊन ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहराचा व्याप माेठा असल्याने एका प्रभागातून नमुने घेतल्यानंतर शेवटच्या प्रभाग संपेपर्यंत बराच विलंब हाेताे. त्यामुळे यादरम्यान तेथे दूषित पाणीपुरवठा हाेण्याची शक्यता असते.
अशी हाेते तपासणी
नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गाेळा करण्यात येतात.
गाेळा केलेले नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयाेगशाळेत पाठवण्यात येतात.
नागरिकांना पुरवठा केलेले पाणी दूषित आहे किंवा शुद्ध आहे याचा अहवाल आल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने उपाययाेजना करण्यात येतात. नमुने घेण्यास विलंब हाेत असल्याने अनेक वेळा माहिती उशिरा मिळते.