लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीला पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले चार गावांचा संपर्क तुटला आहे.मध्यप्रदेशात होत असलेल्या दमदार पावसामुळे वान प्रकल्पा भरण्याच्या मार्गावर असून या प्रकल्पाचे सहा दरवाजे अध्यार्फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ६००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. येत्या काही दिवसात पावसाची वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता असून या पावसामुळे या तालुक्यातील वार्षिक सरासरी ही ९२.१० टक्क्यांवर पोहोचली आहे. संततधार पडणारा हा पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पडत आहे. जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये २४ तासातच आठ टक्यांनी वाढ झाली असून वर्तमान स्थितीत १३४.२७ दलघमी पाणीसाठा प्रकल्पांमध्ये झाला आहे. मोठ्या प्रकल्पापैकी नळगंगा प्रकल्पामध्येही पाच टक्के, पेनटाकळी प्रकल्पामध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम ते कोलंद, वडगाव वान दानापूर मार्गावर असलेल्या वान नदी च्या पुलावरून ६ फूट पाणी वाहत असल्याने काटेल ते कोलंद आदी गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती आहे.
दरम्यान जळगाव जामोद तालुक्यात पूरपरिस्थिती नदी-नाल्यांना पूर आला आहे. मात्र धरणात अद्यापही अत्यल्प जलसाठा आहे. हजारो हेक्टरवरील शेतातील पिके पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. महसूल विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ९ आॅगस्टरोजी सकाळी नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर मानेगावनजीक पुर्णेला पूर गेल्याने २ ते तीन तास वाहूतक ठप्प झाली होती. जिल्हयातील सर्वच प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढण्यास या पावसामुळे मदत होत आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत असून मोठ्या प्रकल्पांपैकी पेनटकाळी प्रकल्प, ज्ञानगंगा आणि मस प्रकल्पांमध्ये जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. खामगाव, चिखली आणि मेहकर शहरांसाठीच्या उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणावी लागले. लघु प्रकल्पांपैकी करडी, मातला, केसापूर, झरी, दहीद, वरवंड येथील प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.(प्रतिनिधी)