विवेक चांदूरकर/ बुलडाणा : केवळ तीन आठवडे आयुवेर्दिक पाणी प्यायल्याने एड्स, कर्करोगासह 56 असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणा-या पाणीवाल्याबाबाला महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिले आहे. तसेच या बाबामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जातवा या गावातील अशोक नथ्थू पवार उर्फ जय हरी महात्मा अशोक माऊली महाराज काही वर्षांपासून आयुर्वेदिक पाणी देऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. एक महिन्यापासून बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. या गावात जय हरी महाराज भाविकांना पाणी देऊन उपचार करत आहेत. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरात महाराज दर शनिवरी येऊन भाविक व रूग्णांना पाणी देतात.
या महाराजाकडून पाणी घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दहीद गावात येत आहेत. शनिवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबेकर, जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र लांजेवार, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव गायकवाड यांनी महाराजाची भेट घेऊन कशाप्रकारे उपचार करतात, याची माहिती जाणून घेतली. यावेळी महाराजांनी आयुवेर्दिक पाण्याद्वारे एड्स व कर्करोगही बरा होत असून, अनेकांना याचा फायदा झाला असल्याचा दावा केला आहे. तर अंनिसने हे सर्व थोतांड असल्याचा आरोप केला आहे. या शनिवारी संपूर्ण राज्यातून जवळपास 7 हजार भाविकांनी हजेली लावली. तसेच दर शनिवारी हजारो भाविक दहीद येथे येऊन उपचार घेतात. महाराज भाविकांना मधुमेह व रक्तदाबाची औषधी देत असून, सध्या सुरू असलेली औषधी बंद करण्याचे सांगत आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळया व औषधी न घेताच केवळ आयुर्वेदिक पाण्याद्वारेच उपचार होत असल्याचा दावा महाराज करीत आहेत.
गावातील नागरिकांची बाबाविरोधात तक्रारहा बाबा गावातील नागरिकांना मधुमेह व उच्च रक्तदाब त्यांच्याकडील पाण्याने बरा होत असल्याचा दावा करीत आहे. तसेच या रूग्णांना सुरू असलेल्या गोळ्या व औषधी घेण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे गावातील सुधाकर साबळे यांनी मधुमेहाच्या गोळ्या बंद केल्याने त्यांची शुगर 400 पेक्षा जास्त झाली होती. तसेच सुरेश राजपूत यांना पायासाठी असलेली औषध बंद करायला लावल्याने त्रास झाला. त्यामुळे महाराजांवर कारवाई करण्याची तक्रार गावातील ज्येष्ठ नागरिक संतोष निकम यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे.राज्यभरातून येतात भाविक महाराजांकडे आपल्या आजारांपासून मुक्ती मिळविण्याकरिता राज्यभरातून भाविक येतात. दहीद बु. या गावात पुणे, औरंगाबादसह अन्य गावातूनही शनिवारी भाविक आले होते. दहीब बु येथे पाण्याव्दारे आजार बरे करण्याचा दावा करणा-या बाबाला वैद्यकीय क्षेत्राची कोणतेही ज्ञान नाही. रूग्णांची शुद्ध फसवणूक करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी सदर बाबावर कारवाई करून जिल्हाबंदी करायला हवी. अन्यथा महाराष्ट्र अंनिसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. - नरेंद्र लांजेवार, जिल्हा कोषाध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, बुलडाणा. ''रूग्णांची कोणतीही फसवणूक करत नाही'' मी रूग्णांना केवळ आयुर्वेदिक पाणी देत असून, त्यामुळे अनेकांचे आजार बरे होत आहे. आजार बरे होत असल्यानेच लोक माझ्याकडे येतात. मी कुणालाही पैसे मागत नसून, भाविक भक्त स्वत:हूनच मला दान देतात. मी रूग्णांची कोणतीही फसवणूक करीत नाही. तसेच गंडे - दोरेही देत नाही. - जय हरी अशोक माऊली महाराज आम्ही दहीद बु. येथे जावून पाहणी केली. तसेच महाराजांना भेटून त्यांना रविवारी सकाळी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात सर्व कागदपत्र व परवानगीसह बोलाविण्यात आले आहे. - अमित वानखडे ,ठाणेदार, बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशन
दहीब बु गावात महाराज रूग्णांना मधूमेह व रक्तदाबाच्या गोळ्या न घेण्याचे सांगत आहे. त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधाकर साबळे यांनी गोळ्या बंद केल्याने त्यांची शूगर ४०० पेक्षा जास्त झाली होती. असेच आणखी रूग्णांसोबत होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करण्याची गरज आहे. - संतोष निकम ग्रामस्थ, दहीद बु.