चिखली : चिखली मतदार संघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीची लाट असल्याचे ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट झाले असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या मतमोजणीदरम्यान हाती आलेल्या निकालानुसार ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, तरुण व महिलांनी आपल्या मतदानाचा कौल महाविकास आघाडीलाच दिल्याचा दावा राहुल बोंद्रेंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
या निवडणुकीत खेड्यातील जनतेने महागाई, कृषीविषयक धोरणे, सामाजिक सलोखा व बेरोजगारी या संगळ्यांचा विचार करून आपली मते काँग्रेस व महाविकास आघाडीला दिली असल्याचे बोंद्रेंनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले. दरम्यान, तालुक्यातील महत्त्वाच्या अमडापूर, मंगरूळ नवघरे, एकालारा, सवणा, भोरसा भोरसी, गांगलगाव, किन्होळा, सावरगाव डुकरे यांच्यासह मतदार संघातील धाड, रायपूर, दुधा, पांग्री उबरहंडे या ग्रामपंचायती काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीकडे आल्या असल्याचा दावा केला असून शेलुद, भडगाव, चांधई, पळसखेड दौलत, भोगावती, गोदरी, हारणी, धोत्रा नाईक, येवता, भालगाव, दहीगाव, शेलसुर, धोत्रा भनगोजी, बोरगाव काकडे, तेल्हारा, उत्रादा, गांगलगाव, हातणी, शिंदी हराळी या ग्रामपंचायतींवर काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, विजयी उमेदवार समर्थकांसह आ.बोंद्रेंच्या जनसंपर्क कार्यालयावर दाखल होत होते. या उमेदवारांचे बोंद्रे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती राजीव जावळे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, बाळु साळोख, दीपक देशमाने, डॉ. इसरार, नगरसेवक रफीक कुरेशी, सचिन बोंद्रे, प्रशांत देशमुख, खलील बागवान, राजू रज्जाक, गजानन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.