शेगाव : सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात संघर्ष ग्रुपच्या वतीने निरंतर अन्नदान करण्यात येते. तसेच शेगाव खासगी रुग्णालयामध्ये फोन करा व विनामूल्य डबा मिळवा, यासह संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष दशरथ घुले, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे, नंदू कुलकर्णी, अनिल उम्बरकर, मनोहर पाचपोर, काजल धुराटे, प्रकाश वाघ, यांच्या सहकार्याने कार्य पार पडत आहे.
मेहकर : येथील हॉटेल पाटलाचा वाडाचे संचालक गजानन गारोळे यांनी रुग्ण व नातेवाईकांना जेवण देण्याचा एक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. मेहकर शहरातील ज्या दवाखान्यात रुग्ण व त्यांचे नातेवाईक असतील व त्यांची जेवणाची व्यवस्था होत नसेल, तर त्या रुग्ण व नातेवाईकांना दवाखान्यापर्यंत जेवणाचा डबा दररोज सकाळ-संध्याकाळ मोफत नेऊन देण्याचे काम गजानन गारोळे करीत आहेत. दिवसाला २०० ते २५० डबे दिले जात आहेत.
शारंगधर बालाजी मंदिर : ज्यांच्या घरी कोरोना बाधित रुग्ण असतील त्यांच्या परिवाराची जेवणाची व्यवस्था होत नसेल अशा रुग्णांच्या संपूर्ण परिवाराकरिता श्री बालाजी संस्थान मेहकरतर्फे घरपोच जेवणाच्या डब्यांची व्यवस्था १३ एप्रिल गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आली होती. श्री बालाजी संस्थान मेहकर येथून आतापर्यंत अनेक गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोहचविले आहेत.