लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कडक निर्बंधांच्या कालावधीत २५ जणांच्या उपस्थितीत लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लग्नासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे लग्नसोहळ्यात अडचणी निर्माण होत असून या साहित्याविना लग्न करावे तरी क, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीसह काही निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध लावताना जिल्हा प्रशासनाने विसंगत निर्णय घेतले आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. लॉकडाऊन काळात अल्प उपस्थितीत लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे लग्नसोहळ्यासाठी आवश्यक असणारे कपडे, सोने, बूट, चप्पल, भांडी यांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नवरदेव - नवरीचे कपडे, सोन्या - चांदीचे आवश्यक दागिने, बूट, चप्पल, गरजेची भांडी यासह इतर साहित्य आणायचे कोठून ? असा यक्षप्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. या आवश्यक साहित्याशिवाय लग्न पार पडू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे लग्नसोहळा आहे ते नागरिक त्रस्त झाले असून लॉकडाऊनच्या या उर्फाट्या नियमांबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. निदान लग्नकार्यासाठी तरी हे साहित्य विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसे करता येत नसेल तर लग्नकार्यालाही परवानगी कशाला देता? अशीही संतप्त भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.
लग्न सोहळ्यांना परवानगी; आवश्यक साहित्याची दुकाने मात्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:20 AM