बुलडाणा : शहरात जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. दरराेज ३०० पेक्षा अधिक रुग्ण निघत असल्याने, प्रशासनाने शुक्रवारी दुपारपासून ते साेमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या रविवारी बुलडाणा शहरातील आठवडी बाजार भरला नाही.
गत काही दिवसांपासून बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काेराेनाची दुसरी लाट आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहे, तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. बुलडाणा शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरताे. गेल्या रविवारी प्रशासनाने आठवडी बाजार बंद केला हाेता, तसेच या रविववारीही लाॅकडाऊन असल्याने आठवडी बाजार भरू शकला नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेते, इतर व्यावसायिक यांचे हजाराे रुपयांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या आठवड्यात बाजार न भरल्याने किरकाेळ विक्रेत्यांवर आर्थिक संकट काेसळले आहे. भाजीपाला विक्रीही बंद असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेहमी गजबजलेला असलेल्या बुलडाण्यातील आठवडी बाजारात रविवारी शुकशुकाट हाेता.
व्यावसायिक संकटात
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून लाॅकडाऊन करण्यात येते. जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात येतात. त्यामुळे इतर व्यवसाय करणारे दुकानदारांवर आर्थिक संकट येते. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. आठवड्यातून काहीच दिवस दुकान सुरू राहत असल्याने बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.