बुलडाणा: कोरोना संक्रमण वाढण्याची भीती पाहता बुलडाण्यातील रविवारचा आठवडी बाजार दोन आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.मुळात सकाळी होणारी हर्राशीच आठवडी बाजार बंद असल्याने होऊ शकली नाही. यासंदर्भात आधीच जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते. मात्र काही शेतकऱ्यांपर्यंत या संदर्भातील निरोप न पोहोचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला त्यांना तसाच परत न्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला.
बाजार बंदचा निर्णय का?जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. बुलडाणा येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी, नागरिक येतात. त्यामुळे सुपरस्प्रेडरच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण आकलनापलीकडे होऊ शकते. हा मुद्दा गृहीत धरून आठवडी बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेही एकट्या बुलडाणा शहरातील कोरोना बाधितांचा दररोजचा आकडा हा ३० च्या घरात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही १५० पर्यंत बाधितांची संख्या जात नव्हती. ती आता दररोज २०० च्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.