लोणार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लाेणार शहरात भरणारा साेमवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला. त्यामुळे २२ फेब्रुवारी राेजी आठवडी बाजारात शुकशुकाट हाेता.
लोणार शहरात दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याने बाजार परिसरात शुकशुकाट दिसून आला.
विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर लोणार शहर वसलेले आहे. यामुळे तालुक्यासह मराठवाड्यातील नागरिक खरेदीसाठी लोणार शहरात येतात. लॉकडाऊन जाहीर झाल्याने नियमावली करत प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे रविवारी सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आल्याने अनेक व्यापारी, दुकानदार, शेतकरी व ग्राहकांपर्यंत आठवडी बाजार भरणार नसल्याची माहिती पोहचू शकली नाही. यामुळे सकाळी काही वेळ सर्वांची तारांबळ उडाली. लोणार नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध कार्य केल्याने आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळता आली. मात्र शहरात मुख्य चौकात दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच आस्थापने सुरू ठेवण्याचे लोणार नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.